साहित्य कट्टा वर्धापन दिन
साहित्यरंग कार्यक्रम
मराठी साहित्य संमेलन
साहित्य कट्टा सदस्य
साहित्य कट्टा सदस्य

❧ साहित्य कट्टा : नऊ वर्षांची अविरत साहित्ययात्रा ❧

साहित्य कट्ट्याची सुरवात २८ ऑगस्ट २०१७ रोजी झाला. हैदराबादमध्ये राहणाऱ्या मराठी मंडळींनी नियमितपणे एकत्र यावे, काही चांगले मराठी साहित्य वाचावे, त्यावर मनमोकळ्या गप्पा माराव्यात या साध्या उद्देशाने एक WhatsApp समूह तयार झाला. त्यानंतर २८ ऑगस्ट २०१७ रोजी व्यंकटेश कुलकर्णी यांच्या घरी काही मोजक्या साहित्यप्रेमींची पहिली बैठक झाली आणि साहित्यकट्ट्याचा पाया रचला गेला.

सुरुवातीला दर महिन्याला भेटून प्रसिद्ध साहित्यिकांचे लेखन वाचण्याचा विचार होता. मात्र लवकरच एक महत्त्वाची जाणीव झाली—उत्तम साहित्य वाचणारे अनेक आहेत; पण नवीन साहित्य निर्माण करणाऱ्यांना व्यासपीठांची कमतरता आहे. तेव्हाच साहित्यकट्ट्याने आपले ध्येय बदलले. हैदराबादमधील मराठी माणसाला लिहिते करणे, हेच कट्ट्याचे मुख्य उद्दिष्ट ठरले.

महिन्यागणिक कट्टा रंगत गेला. कथा, कविता, ललित लेख, प्रवासवर्णने, विनोदी लेख, आत्मकथन अशा अनेक साहित्यप्रकारांतून सदस्य व्यक्त होऊ लागले. सुरुवातीच्या काही सदस्यांचा कट्टा आज २०० च्या आसपास सक्रिय साहित्यप्रेमींच्या कुटुंबात रूपांतरित झाला.

या काळात व्यंकटेश कुलकर्णी, प्रकाश धर्म, पुष्कर कुलकर्णी, दर्शन शहा आणि अवधूत कुलकर्णी यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कविता सादर करून, परिसंवादात सहभागी होऊन साहित्यकट्ट्याची वेगळी ओळख निर्माण केली. आजही अनेक कट्टेकरी साहित्य संमेलनात निमंत्रित म्हणून नियमित सहभागी होत असतात.

२०१९ मध्ये वर्धापन दिनानिमित्त हैदराबादच्या 'लामकान' येथे कट्ट्याचा पहिला सार्वजनिक कार्यक्रम झाला. घरातील बैठकीत रंगणारा साहित्य कट्टा प्रथमच रंगमंचावर अवतरला आणि प्रेक्षकांनी त्याचे उत्स्फूर्त स्वागत केले.

२०२० मध्ये कोविडमुळे प्रत्यक्ष भेटी अशक्य झाल्या. अनेक उपक्रम थांबले; पण साहित्य कट्टा थांबला नाही. कट्टा ऑनलाइन झाला आणि आश्चर्य म्हणजे त्याला अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिसाद मिळाला.

कोविडनंतर साहित्यकट्ट्याने सदस्यांच्या पुस्तक प्रकाशनाचे कार्यक्रम मराठी ग्रंथ संग्रहालयात आयोजित केले. त्यामध्ये व्यंकटेश कुलकर्णी यांचे 'अन् बरंच काही', प्रकाश धर्म यांचे 'श्रावणी इंद्रधनूचे झेले', सूरजकुमारी गोस्वामी यांचे 'तरी आम्ही बोलत नाही' आणि मीनाताई खोंड यांचे 'सीताशक्ती' पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

याच काळात साहित्यकट्ट्याची मंडळी मराठी साहित्य परिषद, हैदराबादच्या विविध उपक्रमांत सक्रिय सहभागी झाली. परिषदेच्या 'पंचधारा' या त्रैमासिकात अरुण डवलेकर, गायत्री शिरोळे, व्यंकटेश कुलकर्णी, उज्ज्वला धर्म यांसारख्या लेखकांनी सातत्याने लेखन केले.

'साहित्यवड' : दिवाळी अंकाची परंपरा

२०२२ मध्ये साहित्यकट्ट्याने स्वतःचा डिजिटल दिवाळी अंक 'साहित्यवड' सुरू केला. हैदराबादसह विविध ठिकाणच्या लेखकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला. गेली पाच वर्षे हा अंक सातत्याने प्रकाशित होत असून अनेक नवोदित लेखकांसाठी तो पहिले प्रकाशन ठरला आहे.

साहित्यरंग : शब्दांना रंगमंच

२०२३ मध्ये साहित्यकट्ट्याने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकले— 'साहित्यरंग' या नव्या उपक्रमाची सुरुवात झाली. कट्ट्यावर लिहिले जाणारे साहित्य रंगमंचावर यावे, या उद्देशाने हा प्रयोग सुरू झाला. 'नाट्यछंद' या शीर्षकाखाली सातत्याने हे उपक्रम सादर होत आहेत.

पुष्कर कुलकर्णी, अवधूत कुलकर्णी, प्रवीण कावडकर, अरुण डवलेकर आणि इतर सदस्यांच्या नाटिका व एकांकिका हैदराबादमध्ये सादर करण्यात आल्या. अवघ्या तीन वर्षांत दहापेक्षा अधिक नाटिका आणि एकांकिकांचे प्रयोग रंगले. व्यंकटेश कुलकर्णी लिखित मराठी गझलांचा एक सुंदर कार्यक्रमही सादर करण्यात आला.

मराठी साहित्य परिषदेच्या व्यासपीठावर साहित्यकट्ट्याने 'गडकरी साहित्यदर्शन' आणि 'एक मिसळ अशीही' हे विशेष कार्यक्रम सादर केले. तेलंगणा सारस्वत परिषदेत झालेल्या या कार्यक्रमात नांदी, बतावणी, भारूड, गोंधळ, पोवाडा अशा महाराष्ट्राच्या विविध लोककलांचा देखणा संगम अनुभवायला मिळाला.

विशेष म्हणजे लेखन, संगीत, दिग्दर्शन आणि सादरीकरण—सर्व काही कट्टेकऱ्यांनीच केले.

नियमित उपक्रम

आजही प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी साहित्य कट्टा ऑनलाइन किंवा प्रत्यक्ष स्वरूपात भरतो. कधी विशिष्ट विषय दिला जातो, तर कधी मुक्त लेखन असते; पण उद्दिष्ट मात्र कायम एकच— हैदराबादमधील मराठी माणसाला लिहिण्यास प्रवृत्त करणे.

नियमित मासिक कट्ट्याबरोबरच दरवर्षी तीन विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात—

साहित्यवड दिवाळी अंक प्रकाशन – प्रकाशनाबरोबरच अंकातील निवडक साहित्याचे अभिवाचन.

महिला दिन विशेष कट्टा – लेखन कट्टेकऱ्यांचे असले तरी संपूर्ण सादरीकरण महिलांचे.

साहित्य कट्टा वर्धापन दिन – साहित्य, मैत्री आणि स्नेहभोजनाचा उत्सव.

कोविड काळात 'माझा छंद' आणि 'मी आणि डॉक्टर' या विषयांवर लेख मागवून त्यांचे संकलन करण्यात आले.

साहित्यकट्ट्याची खरी ओळख

साहित्य कट्टा ही नोंदणीकृत संस्था नाही; ती समान विचारांच्या साहित्यप्रेमींची एक मुक्त चळवळ आहे. येथे कोणतेही प्रवेश शुल्क नाही, मासिक किंवा वार्षिक वर्गणी नाही. हैदराबादमध्ये राहणाऱ्या आणि मराठी साहित्य वाचन-लेखनाची आवड असलेल्या कोणालाही साहित्यकट्ट्याचा सदस्य होता येते.

कार्यक्रमांचा खर्च उपस्थित सदस्य आपापसांत वाटून घेतात. त्यामुळे येथे पदे नाहीत, पदानुक्रम नाही—सर्व सदस्य समान आहेत. हीच साहित्यकट्ट्याची सर्वात मोठी ताकद आहे.

याच धर्तीवर साहित्यरंग हे दालनही सर्वांसाठी खुले आहे. अभिनय, गायन, नृत्य, संगीत, निवेदन किंवा इतर कोणतीही कलात्मक आवड असेल आणि रंगमंचावर काहीतरी सर्जनशील करण्याची इच्छा असेल, तर साहित्यरंगमध्ये सहभागी होता येते.

आज साहित्य कट्टा हा केवळ मासिक साहित्यवाचनाचा उपक्रम राहिलेला नाही; तो अनेक नवोदित लेखक, कवी, नाटककार, अभिनेते आणि रसिकांना एकत्र आणणारे सर्जनशील व्यासपीठ बनला आहे. नऊ वर्षांचा हा प्रवास म्हणजे केवळ कार्यक्रमांचा इतिहास नाही, तर शब्दांवर प्रेम करणाऱ्या माणसांनी एकत्र येऊन घडविलेली एक जिवंत साहित्यचळवळ आहे.

❧ कट्टे करांची प्रकाशित पुस्तके ❧

अर्धवटांच्या गोष्टी - नागेश शेवाळकर
लेखकनागेश शेवाळकरnageshspande@gmail.com
नागेश शेवाळकर
एक होता कॅन्सर - प्रिया जोशी
लेखिकाप्रिया जोशीprijo@ymail.com
प्रिया जोशी
गूंज - स्वाती बालूरकर, सखी
लेखिकास्वाती बालूरकर, सखीswatibalurkar.author@gmail.com
स्वाती बालूरकर, सखी
Just for You - स्वाती बालूरकर, सखी
लेखिकास्वाती बालूरकर, सखीswatibalurkar.author@gmail.com
स्वाती बालूरकर, सखी
माझी सव्यसाच्याची... - विवेक देशपांडे
लेखकविवेक देशपांडेvivekjaya@yahoo.com
विवेक देशपांडे
पडसाद - स्वाती बालूरकर
लेखिकास्वाती बालूरकरswatibalurkar.author@gmail.com
स्वाती बालूरकर
प्रीती - स्वाती बालूरकर
लेखिकास्वाती बालूरकरswatibalurkar.author@gmail.com
स्वाती बालूरकर
सांध्यगाथा - प्रिया जोशी
लेखिकाप्रिया जोशीprijo@ymail.com
प्रिया जोशी
सुरक्षा : प्रश्न काही उत्तर, काही अनुत्तर - विवेक देशपांडे
लेखकविवेक देशपांडेvivekjaya@yahoo.com
विवेक देशपांडे
Through Thick and Thin - विवेक देशपांडे
लेखकविवेक देशपांडेvivekjaya@yahoo.com
विवेक देशपांडे
अबोली - सूरजकुमारी
लेखकसूरजकुमारीgoswamisurajkumari@gmail.com
सूरजकुमारी
फेसबुक - अनंत जोशी
लेखकअनंत जोशीinfo@marathisahitya.org
अनंत जोशी
काश्मीर - अनंत जोशी
लेखकअनंत जोशीinfo@marathisahitya.org
अनंत जोशी
श्रावणी - प्रकाश धर्म
लेखकप्रकाश धर्मapnaprakash.hyd@gmail.com
प्रकाश धर्म
स्वप्न - नागेश शेवाळकर
लेखकनागेश शेवाळकरnageshspande@gmail.com
नागेश शेवाळकर
तरी - सूरजकुमारी गोस्वामी
लेखकसूरजकुमारी गोस्वामीgoswamisurajkumari@gmail.com
सूरजकुमारी गोस्वामी